Breaking

6/recent/ticker-posts

मनमानी करणाऱ्या कारखान्याला अखेर झुकावे लागले - अजिनाथ परबत, स्वाभिमानी शेतकरी संघटना



सोलापूर जनसंवाद |माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उसाची नोंद नाकारल्याने तांदुळवाडी (ता.माढा) येथील शेतकरी अजिनाथ परबत यांनी साखर आयुक्तांकडे तक्रार केली होती. साखर आयुक्तांच्या आदेशानुसार गळीत हंगाम २०२३-२४ साठी कारखान्याला ऊसाची नोंद घ्यावी लागली आहे.


तुम्ही आमचे कारखान्यावर आंदोलन का करता, कारखान्याच्या निवडणूकीमध्ये भाग का घेता तसेच सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांना बोलू न देणे, सभासदांना ताळेबंद न देणे याबाबत जाब का विचारता अशा कारणामुळे येथील चेअरमन, कार्यकारी संचालक राजकीय द्वेषापोटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना वेठीस धरत असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ऊसाची नोंद घेण्यास नकार देत असल्याचे कारण देत येथील शेतकरी अजिनाथ परबत यांनी तक्रार केली होती.


"सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही' शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी कारखान्याच्या चुकीच्या धोरणाला विरोध केल्याने सभासदत्व रद्द करण्यासाठी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कुटील डाव टाकले परंतु संघटना जिद्दीने लढत राहिली, पाठपुरावा केला म्हणून आज मला साखर आयुक्तांकडून न्याय मिळाला. कुठेही जा, नोंद घेत नाही म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे. सहकारी कारखाने ही काळाची गरज आहे. नफ्यात असलेला कारखाना खाजगीकरण करून  घशात घालण्याचा डाव सुद्धा लवकरच उधळून लावू'- अजिनाथ परबत, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना '


तक्रारीच्या अनुषंगाने साखर आयुक्तांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याला संबंधित शेतकऱ्याच्या उसाची नोंद घेण्याचे पत्र दिले होते परंतु कारखान्याने साखर आयुक्तांच्या पत्राचा अवमान करीत शेतकऱ्याच्या ऊसाची नोंद दोन वेळा नाकारली होती.



पिडीत शेतकरी हे गेली अनेक वर्षे कारखान्यास ऊस गाळपास पाठवित होते. कारखान्याच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासोबतच कारखान्याने एखादे चांगले काम केल्यानंतर त्याचे अभिनंदनही त्याच पदाधिकारी शेतकऱ्याने केले आहे. अजिनाथ परबत यांनी आडसाली २६५ जातीचा तांदूळवाडी (ता.माढा) येथील गट नं. ३३७/१ या गटामधील १हे.२१आर क्षेत्रात दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजी लागण केलेल्या ऊसाची नोंद करण्यासाठी संबंधीत शेतकी अधिकारी, कार्यकारी संचालक, चेअरमन यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु ऊसाची नोंद नाकारण्यात आली होती. तद्नंतर साखर आयुक्त यांचेशी पत्रव्यवहार केला, आयुक्तांनी ऊसाची नोंद घेण्याबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी कारखान्याला आदेशित केले होते परंतु कारखान्याकडून या आदेशाला केराची टोपली दाखवली होती.

नोंद न घेण्यामागील कारण

यातील पिडीत शेतकऱ्याने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलेल्या पत्रात उल्लेख केला होता की, कारखान्याच्या चुकीच्या धोरणाला विरोध करणाऱ्या शेतकरी सभासदांचा ऊस सतत ३ वर्षे गाळपास आणायचा नाही. त्यानंतर सलग तीन वर्षे ऊस गाळपासाठी पाठवला नाही म्हणून सभासदत्व रद्द करायचे हा राजकीय कुटील दाव आहे. कुटील डाव करून सभासदत्व रद्द करण्यासाठी कारखान्याकडून मुद्दामहून ऊस गाळपास आणला जात नाही व ऊसाची नोंद घेतली जात नाही. कायम सत्तेत राहिल्यामुळे त्यांचे राजकीय वजन जास्त असल्याने आवाज उठवणाऱ्याचा आवाज दाबला जात आहे. 'राजाने मारले व पावसाने झोडपले' तर दाद कोणाकडे मागावयाची अशी अवस्था असल्याचे नमूद करीत साखर आयुक्त यांच्याकडे याबाबत दाद मागितली होती.