Breaking

6/recent/ticker-posts

सोलापूर व माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा -जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद

 


सोलापूर, दिनांक 11 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 42 सोलापूर 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहेत. तरी पोलीस विभागाने या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

              नियोजन समिती सभागृह येथे आयोजित निवडणूक कामकाज विषयक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण व्यवस्थापन संतोष देशमुख, खर्च समितीच्या नोडल अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असून या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त तीन वाहनांना प्रवेश असेल. तसेच प्रत्यक्ष कार्यालयात उमेदवारासह एकूण पाच व्यक्तींना प्रवेश असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस विभागाने अत्यंत सूक्ष्मपणे नियोजन करून सुरक्षा व्यवस्था ठेवावी.

             त्याप्रमाणेच ईव्हीएम मशीन रामवाडी येथील स्ट्रॉंग रूम मधून प्रत्येक विधानसभा निहाय पाठवल्या जाणार आहेत त्यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा. स्ट्रॉंग रूम येथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला प्रवेश राहणार नाही. निवडणूक संबंधित काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला ओळखपत्र असल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नये. ईव्हीएम मशीन विधानसभा मतदारसंघात घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनासोबत पोलीस सुरक्षा व्यवस्था देण्यात यावी. सर्व चेक पोस्टवर वाहनांची कसून तपासणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.

             जनरल, पोलीस व खर्च निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात येत असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपल्याशी संबंधित माहिती तयार ठेवावी. निवडणूक निरीक्षक यांच्या सूचनेप्रमाणे त्यांना सदरची माहिती उपलब्ध करून द्यावी. निवडणूक प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना शो- कॉज नोटीस पाठवून त्यांचे प्रशिक्षण 14 एप्रिल पर्यंत पूर्ण करावे. आयोगाच्या निर्देशक क्रमाने सर्व संबंधित निवडणूक कामकाजासाठी घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले पाहिजे. तसेच एकही निवडणूक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी. होम बेस्ड मतदान व पोस्टल बॅलेट मतदानाच्या अनुषंगाने कार्यवाही पूर्ण करावी, असे ही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सूचित केले.