Breaking

6/recent/ticker-posts

ट्रॅक्टर चालकांनो सावधान! पुढे धोका आहे.

प्रकाशक - एस.एस.वाघमारे - 9527271389
जनसंवाद

 कुर्डूवाडी दि.७ : कुर्डूवाडी आणि परिसरात अनैतिक मार्गाने कमाई करण्याचे अनेक फंडे वापरले जातात. वाम मार्गाने कमाई करण्याचे उद्योग हे सर्वसामान्य जनता, पिडीत व्यक्ती आणि पोलिस प्रशासनाला माहीत नाहीत असे नाही. बनावट मद्याचा सुळसुळाट असो की हनी ट्रॅप असो हे विषय जवळपास सगळ्यांनाच माहीत असावेत. अशा अनैतिक प्रकारांमध्ये छोटे मोठे गुंड, ठराविक गल्ली बोळातील राजकीय नेते, पोलिस प्रशासनातील कर्मचारी सहभागी असल्याच्या चर्चा जोर धरत असताना आता नवीन उद्योग सुरू झाल्याचे दिसून येत आहे.


साखर कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना ऊसतोड मजूर आणि ट्रॅक्टर चालक यांचे सुगीचे दिवस असतात. सुगीचे दिवस यासाठी की, कारखाना सुरु होण्यापूर्वी घेतलेली उचल फिटून रोख रक्कम हातात आलेली असते. ज्या वेळी ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टर चालकांच्या हातात रोकडा असतो तेव्हा अनेक वैध आणि अवैध व्यावसायिकांचा डोळा यांच्याकडे असतो. कामगारांच्या हातातील पैका आपल्या खिशात कसा येईल यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न सुरू असतात. त्यापैकी एक उद्योग कुर्डूवाडी शहरात राजरोसपणे सुरू आहे.


कुर्डूवाडी येथील संकेत मंगल कार्यालय ते टोल नाका या परिसरात एक अनाकलनीय घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. साधारण २५ वर्षाची एक महिला आणि एक पुरुष फक्त ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला हात करून लिफ्ट मागतात. किंवा चहा घेण्यासाठी हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅक्टर चालकाला पुढच्या चौकात सोडण्याची विनंती करतात. त्याच वेळी महिले सोबतचा पुरुष ट्रॅक्टरचा नंबर पाहून घेतो.


ट्रॅक्टर थोड्या अंतरावर गेला की लगेच ट्रॅक्टर चालकाला पैशाची मागणी करतात. ट्रॅक्टर चालक विनाकारण पैसे देण्यास तयार होत नाही. त्यामुळे विनयभंग केल्याची पोलिसात तक्रार देऊ अशी धमकी देऊन ट्रॅक्टर चालकाला ब्लॅकमेल केले जाते. ट्रॅक्टर चालकाजवळ जितकी रक्कम मिळेल ती सर्व रक्कम काढून घेतली जाते. आणि तक्रार केली तर तुझ्या ट्रॅक्टरचा नंबर आमच्याकडे आहे. आम्ही पण तुझ्या विरोधात तक्रार करू अशी धमकी देऊन पुढील चौकात ते ट्रॅक्टरमधून उतरतात.


हा प्रकार कुर्डूवाडी बायपास येथील टोल नाका परिसर ते संकेत मंगल कार्यालय दरम्यान सुरू आहे. ट्रॅक्टर चालक या प्रकाराची तक्रार करण्यास पुढे येण्यास धजावत नसल्याने हा ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय जोमात सुरू आहे. या रस्त्यावरून शेकडो ट्रॅक्टर ऊस वाहतूक करीत आहेत. एक एक सावज हेरून  मोजून १५-२० मिनिटात एका चालकाला गंडवले जाते. २५ व्या मिनिटाला दुसऱ्या चालकाची पट्टी पाडण्यास सुरुवात झालेली असते.


हा प्रकार फक्त कुर्डूवाडी येथेच सुरू आहे की तालुक्यातील इतर ठिकाणी पण सुरू आहे याची माहिती घेणे आवश्यक आहे. या प्रकारावर वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. या ब्लॅकमेलर महिलेच्या वेळीच मुसक्या आवळणे गरजेचे आहे. संबंधित महिलेला मदत करणारे अदृश्य हात आहेत का याची शहानिशा होणे आवश्यक आहे.


कुर्डूवाडी परिसरातील टोल नाका ते टेंभूर्णी रोड येथील संकेत मंगल कार्यालयापर्यंत जवळपास ७-८ हॉटेल रात्रभर सुरू असतात. त्यामुळे अशा दरोडेखोर, ब्लॅकमेलर व्यक्तींना थांबण्यासाठी आश्रय मिळतो. असे गुन्हेगार पोलिसांसमोर जरी असले तरी हॉटेलमध्ये चहा-पाणी घेण्यासाठी थांबले असतील असे समजून त्यांच्याकडे सहज दुर्लक्ष होते. रात्रभर चालणाऱ्या हॉटेल्समुळे अवैध धंदे, अनैतिक कृत्यांना खतपाणी मिळत असल्याचे पहावयास मिळते.

०००