Breaking

6/recent/ticker-posts

गटबाजीला कंटाळून भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष चंद्रकांत राखुंडे यांचा राजीनामा

 


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगत येत असताना भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे. मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे येथील राजकीय समीकरणे बदलली असून ‘काटे की टक्कर’ असा हा सामना तयार झालेला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक एक पदाधिकारी महत्वाचा आहे. त्यात करमाळ्यातील भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत राखुंडे यांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.


माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील व महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात अटीतटीचा सामना सुरु झालेला आहे. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरु आहे. त्यात भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राखुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पंढरपूर विभागाच्या जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धिपत्रकही दिले आहे. भाजपही एक परिवार आहे असे सांगितले जाते येथे पक्षाला जास्त महत्व दिले जाते असे बोलले जाते. असे असताना अंतर्गत गटबाजी कशी झाली आणि याबाबत फादर बॉडीला कल्पना देऊनही का कोणीच लक्ष दिले नाही असा प्रश्न यातून निर्माण होत आहे. याची चर्चा सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.


राखुंडे यांनी राजीनामा देताना म्हटले आहे की २००८ पासून मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. फादर बॉडीला गटबाजीबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र गटबाजीला खतपाणी घातले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. फादर बॉडीने गटबाजी थांबवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप हे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी राखुंडे यांची निवड केली होती. राखुंडे हे भाजपमधील सक्रिय कार्यकर्ते आहेत. करमाळा शरहातील प्रश्नाबाबत त्यांनी नेहमी आवाज उठवला होता. मात्र निवडणूक काळात त्यांनी राजीनामा का दिला आणि गटबाजी करत त्यांना कोणी डावलले हा चर्चेचा विषय असून भाजपचे उमेदवार निंबाळकर हे करमाळा दौऱ्यावर असताना त्यांनी दिलेला राजीनामा लक्ष वेधत आहे.