Breaking

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी गोळीबार प्रकरणी खाजगी सावकारीचा विषय ऐरणीवर, आर्थिक व्यवहारातून झाला गोळीबार.

 


टेंभुर्णी/सोलापूर, दि.२५: टेंभुर्णी येथील जगदंबा व्हेजीटेबलचे चालक राहुल पवार यांच्यावर काळ्या कारमधून आलेल्या सहा जणांनी धारदार शस्त्राने डोक्यात वार करून पिस्टलमधून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राहुल पवार यांच्या मांडीत गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले. टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये अतीदक्षता विभागात उपचार सुरू असून पवार यांच्या जबाबावरून टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना रविवार दि.२४ रोजी सायं ५:४० वाजण्याच्या सुमारास घडली.

सविस्तर हकीकत अशी की, राहुल महादेव पवार वय ३५ वर्षे, रा. महादेव गल्ली, टेंभुर्णी (ता. माढा) यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या जगदंबा व्हेजीटेबल या दुकानात भाजी विक्री करीत असताना धिरज रमेश थोरात रा.टेंभुर्णी हा त्याच्या अन्य पाच साथीदारासह काळ्या कारमधून येऊन राहुल पवार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पवार यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला आणि नंतर पिस्टलमधून फायारींग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

हा हल्ला सावकारी व्यवहारातून झाला असून १२ लाख रुपयाचा व्यवहार अपूर्ण असल्याने चिडून जाऊन पवार याना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. राहुल पवार जखमी असून टेंभुर्णी येथील मार्स हॉस्पिटलमध्ये अतीदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सपोनि श्री. जोग यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन राहुल पवार यांचा जबाब नोंदवून घेतला. गुन्ह्यात वापरलेल्या दोन पिस्टल, एक कोयता घटना स्थळावरून जप्त करण्यात आला आहे.

घटना घडल्यानंतर टेंभुर्णी शहरात फायरिंग झाल्याची माहिती सर्वत्र पसरली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक पोलीस अधिक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील, कुलदीप सोनटक्के यांनी घटना स्थळास भेट देऊन पाहणी केली. आरोपींचा शोध घेण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.

राहुल पवार यांनी दिलेल्या जबाबावरून आरोपी धिरज रमेश थोरात रा. सुर्ली रोड, टेंभुर्णी व इतर पाच जणांविरुद्ध भादवि कलम ३०७, ३२६, ३२३, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ आर्म ॲक्ट ३, २५, २७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, महा. सावकारी अधिनियम का. कलम ३९, ४५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत.