Breaking

6/recent/ticker-posts

माढा लोकसभा: रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चुरस कायम.

कुर्डूवाडी :  माढा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यातील उमेदवारांपैकी  युतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,  महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असून आपापले नेते, कार्यकर्ते प्रचाराच्या कामात दंगआहेत. मतदार संघातील आजी माजी आमदार, त्यांचे कार्यकर्ते जोमाने आणि तोडीस तोड प्रचार करीत असल्याचे दिसून येते. आरोप प्रत्यारोप तर होत राहणारच.


मराठा आरक्षण मागणी आंदोलनावेळी मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन गट पडले होते. हे दोन्ही गट आपापली ताकत मतदानाच्या माध्यमातून दाखवून देणार असल्याचे जाहीरपणे व्यक्त करीत होते.  त्यामुळेच तर वंचित बहुजन आघाडीने रमेश बारस्कर यांना उमेदवारी देऊन ओबीसी चेहरा समोर आणला आहे. वंचितची पारंपारिक मते आणि ओबीसी पॅटर्नमधून मिळणारी मते ही सुद्धा निर्णायक ठरणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवार प्रा.लक्ष्मण हाके यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर अनेक ओबीसी सभा गाजविल्या आहेत. मतदार संघात समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना मिळणारी मते सुद्धा निर्णायक भूमिका बजावू शकतात.


शिवसेना पक्ष फुटल्यानंतर जशा जनतेच्या भावना होत्या अगदी तशाच तीव्र भावना  राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर जनतेच्या मनात निर्माण झाल्या. शरद पवार यांना जनतेतून सहानुभूती आहे हे अचूक हेरून मोहिते पाटलांनी उमेदवारी अर्ज भरेपर्यंत मतदारांचे आणि मिडियाचे लक्ष वेधून घेतले होते. शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी धैर्यशीलांनी मोठ्या धैर्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन तुतारी हाती घेतली. माढा अन् पाडा, गाडा हे शब्द प्रत्येकाच्या ओठावर थैमान घालू लागले. कोण कुणाला पाडणार, कोण कुणाला गाडणार हे मतदानाच्या निकालातून समोर येणार असले तरी लोकसभेला प्रतिष्ठा पणाला लावलेल्या नेत्यांना मात्र विधानसभा जड जाणार असल्याचे दिसून येत आहे.