Breaking

6/recent/ticker-posts

नामांकित पैलवान आणि रिपाई नेता आमनेसामने; सकारात्मक पोलिसगिरीमुळे मोठा अनर्थ टळला.

 


कुर्डूवाडी दि.१२ | कुर्डूवाडी शहरातील अपूर्ण गटारी व इतर विषयांसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयावर रिपाईच्या वतीने हलगी मोर्चा आंदोलन पुकारण्यात आले होते.


हलगी आंदोलनासाठी सोमवारी (दि.११) सकाळी अकराच्या सुमारास रॅलीद्वारे दुचाकीवरुन जात असताना रिपाइंचे कार्यकर्ते व समोरून चारचाकी गाडीतून येणाऱ्या महाराष्ट्र उपकेसरी व मुंबई महापौर केसरी किताब विजेते गणेश जगताप (रा. कुई ता.माढा) यांच्यात चारचाकी गाडी पाठीमागे घेण्याच्या कारणावरून वाद झाला. तेव्हा गणेश जगताप यांच्या गाडीची काच फोडून धक्का बुक्की केल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले.


कुईवाडी नगरपरिषदेच्या कार्यालयात शहरातील अपूर्ण गटारी, रस्ते व पथदिवे या कामांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हलगी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आकाश जगताप, शहराध्यक्ष बाळासाहेब शेंडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावरून दुचाकी गाडीवरून नगरपरिषदेकडे जात असताना येथील टिळक चौकातील लक्ष्मी थिएटरजवळ हा प्रकार घडला. 


या घटनेची माहिती कळताच, तातडीने येथील पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे यांच्या पथकाने नगरपरिषदेच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, कोणत्याच प्रकारे परिसरातून आलेले तरुण पहिलवान ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून एक-दोन तासांनंतर करमाळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, बार्शी विभागाचे विभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्यासह टेंभुर्णी, करमाळा, माढा, मोहोळ, बार्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व सोलापूरकडून ग्रामीण पोलिस दलाच्या स्पेशल टास्क फोर्सची मोठी कुमक मागविण्यात आली. शहर आणि परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.


यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जमावाची समजूत काढली. साधारण ३ तास चाललेल्या चर्चेतून सर्व वादावर पडदा टाळण्यात पोलिस अधिकाऱ्यांना यश आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पोलिस अधिकाऱ्यांना मोठा अनर्थ टाळण्यात यश आले. यावेळी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सकारात्मक पाऊल उचलल्याने पोलिस अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.