Breaking

6/recent/ticker-posts

रोडवर उभा केलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला धडकून एकजण गंभीर जखमी

  

Jansanvad

म्हैसगाव दि.१२ : चुकीच्या दिशेला आणि रोडवर उभा केलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून मोटरसायकलस्वार बाळासाहेब गोडगे रा.म्हैसगाव (ता.माढा) यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले असून जवळ असलेल्या नागरिकांनी त्यांना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवार दि.१२ रोजी सायंकाळी ७:३० दरम्यान म्हैसगाव येथील हॉटेल विसावा जवळ घडली.


अपघाताची सविस्तर हकीकत अशी की, म्हैसगाव येथील बाळासाहेब गोडगे हे सायंकाळी ७:३० च्या दरम्यान माढाकडे मोटरसायकल क्र.एम.एच.४५ ए.पी.०५३५ या होंडा शाईन मोटरसायकलवरून माढा येथे जात होते. कुर्डूवाडी-बार्शी रोडवरील हॉटेल आशीर्वाद ते हॉटेल विसावा दरम्यान उलट दिशेला ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली रोडवर सोडण्यात आली होती. ट्रॉलीला रेडियम किंवा रिफ्लेक्टर नसल्याने रस्त्यात उभा असलेली ट्रॉली दिसून न आल्याने मोटारसायकलची जोरदार टक्कर बसून मोटरसायकल चालक बाळासाहेब गोडगे यांच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले.


रस्त्याच्या बाजूला जवळच उभा असलेले आनंद पाटील यांनी अपघात स्थळी धाव घेतली. अपघातात म्हैसगाव येथील गोडगे यांच्या डोक्याला मार लागून ते रस्त्यावर पडले असल्याचे आणि अती रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून तात्काळ बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेले. आणि नातेवाईकांना खबर दिली.


दरम्यान जमलेल्या व्यक्तींनी कुर्डूवाडी पोलिसात अपघाताची खबर दिली. खबर दिल्यानंतर कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री.शिवाजी कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. उसाने भरलेली ट्रॉली कुर्डूवाडी बार्शी रोडवर उभा असल्याने रात्रीच्या वेळी अजून दुसरे अपघात होऊ नयेत म्हणून ट्रॅक्टर कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने व सर्व नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असल्या कारणाने बातमी प्रकाशित होईपर्यंत गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.


एक ट्रॉली रस्त्यावर सोडून दुसरी ट्रॉली घेण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टर चालकास अपघाताची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक याने ट्रॅक्टरचे हेड ऊसात लपवून धूम ठोकली. ट्रेलरवर नंबर नसल्याने ट्रॅक्टर मालक आणि कोणत्या कारखान्याला ऊस वाहतूक केली जात आहे याची माहिती मिळू शकली नाही. 


या निमित्ताने पुन्हा एकदा अकलूज उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. ट्रेलर पासींगचा जुनाच विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचसोबत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणारी यंत्रणा कारखानदारासमोर नांगी टाकते हे एक वास्तव नाकारता येत नाही.


कुर्डूवाडी - बार्शी रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले तरी अद्याप रत्यावर दिशादर्शक फलक, पांढरी रिफ्लेक्टर पट्टी नसल्याने सुद्धा रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेक अपघात झाले आहेत. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. कुर्डुवाडी बार्शी रस्त्याच्या साईट पट्टीची रुंदी कमी अधिक प्रमाणात असून साईट पट्टीवर कोणतेही चार चाकी वाहन उभा करता येईल इतकी रुंदी असणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे. एखादे वाहन नादुरुस्त झाले तर रत्याच्या बाजूला उभा करण्याइतपत जागा दिसून येत नाही. रस्त्यात नादुरुस्त होणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या बाजूला वाहन लवण्याइतपत जागा नसल्यानेही  अनेक अपघात होत आहेत. 

०००